पंढरपूर : लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश ठप्प असून यामुळे सर्वसामान्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. यासाठी सरकार गहू व तांदुळ मोफत वाटत असले तरी याबरोबरच राज्य सरकारने साखर, तेल व दाळ या जीवनावश्यक वस्तू देखील सवलतीच्या दरात उपलब्ध कराव्यात अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राव्दारे केली आहे.
सध्या संपुर्ण देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र शासनाने संपुर्ण देशात संचारबंदी वाढवली आहे. बंदमुळे हातावर पोट असणार्या गरीबांचे मोठे हाल होत आहेत. याचा विचार करूनच पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक नागरिकांना शासनाकडून प्रती व्यक्ती गहु व तांदुळ मोफत मिळत आहे. परंतु दाळ, साखर, तेल व इतर या रोजच्या लागणार्या जीवनावश्यक वस्तु देणे देखील गरजेचे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व समाजसेवक हे त्यांच्या परीने गरीब, भिकारी व गरजुंना अन्नदान व रेशन धान्य देत आहेत. परंतु सर्व नागरिकांना मदत मिळेलच असे नाही. अनेक नागरिक हे मदतीपासून वंचित राहतात तर स्वाभिमानी लोक कोणापुढे मदतीचा हात पसरत नाहीत. यामुळे सर्वच गरजुंचा विचार करून राज्य शासनाने रेशन दुकानामध्ये नागरिकांना प्रती व्यक्ती प्रत्येकी 2 किलो साखर, 1 किलो तेल, 1 किलो दाळ या जीवनावश्यक वस्तु सवलतीच्यादरात उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची सोय होईल अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार
यांचेकडे लेखीपत्राद्बारे केली.

Post a Comment